अधिकमासाची जन्मकथा ( Adhik Mahinyachi Janmakatha )
 |
पुरुषोत्तम मास
|
अधिक महिना म्हणजे काय? तो कधी आहे ? त्याचा पौराणिक आधार जाणून घेऊयात.
हिंदू कॅलेंडरप्रमाणे दर तीन वर्षानी एकदा अतिरिक्त महिना येतो, त्यालाच आपण "अधिकमास" किंवा “मलमास" किंवा "पुरुषोत्तम मास" तसेच धोंडी मास" असे म्हणतो. या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण विश्वभरातील हिंदू लोक या महिन्यात धार्मिक कार्य, पूजा, भगवत भक्ती, उपवास, जप आणि योग इत्यादीमध्ये व्यस्त असतात . असे मानले जाते की अधिकमासामध्ये केलेल्या धार्मिक कार्याचा परिणाम इतर कोणत्याही महिन्यात केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यापेक्षा 10 पट जास्त होतो. यामुळेच या महिन्यात सर्व लोक भक्तीने भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आनंदाने आणि मनापासून विधियुक्त पूजा आर्चा करतात.
अधिकमासाची जन्मकथा
एक दिवस नारदमुनींनी भगवान विष्णूंना विचारले, " हे प्रभू, दर वर्षी फक्त १२ महिनेच असतात.मग बरोबर पाऊणेतीन वर्षांनी हा अतिरिक्त महिना कसा काय येतो ? आणि त्याला एवढा मान का ? त्यावर भगवान नारायण म्हणाले , "मुनिवर्य ! चांगले किंवा वाईट हे आपल्या पाप आणि पुण्याच्या प्रमाणांवर अवलंबून असते. पण सर्वत्र फक्त दुष्कृत्येच वाढली आहेत त्यामुळे साहजिकच हि वाढलेली पापे आपल्याला सहन होत नाही अशी बाराही महिन्यांनी मिळून तक्रार केली. त्या पापांचे जड ओझे बारा
महिन्यांच्या पोटात मावेनाशे झाले. त्यामुळे त्या बाराही महिन्यांनी आपापल्या पोटातील पापाचा फक्त तिसरा हिस्सा बाहेर काढून टाकला. बाराही महिन्यांनी आपापल्या पापांचे ओझे तेवढा कमी केले . परंतु बाराही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापाच्या हिस्स्यापासून तेरावा महिना जन्माला आला. तोच हा " अधिक मास ". पण तो पापमय असल्याने त्याला " मलमास " किंवा मलिनमास असे नाव पडले. सगळे आपला तिरस्कार करतात, आपण कोणालाच आवडत नाही आपलं नावसुद्धा कोणी घेत नाही हे बघून तो अतिशय दुःखी झाला. त्याला फार वाईट वाटले. कारण सगळ्या बारा महिन्यांना प्रत्येकी इष्ट देव होता पण आपला कोणीच स्वामी नाही. माझ्या मासात सूर्यहि साधी त्याची प्रदक्षिणा करायला तयार नाही. त्यामुळे शुभ कार्येही होत नाही. . आपली अशी दुर्दशा झालेली पाहून तो आपल्या दैवाला दोष देऊ लागला व मुक्ति मिळावी या इच्छेने तो ( मलमास ) शेवटी वैकुंठात श्री भगवान विष्णुंकडे गेला.त्यांची प्रार्थना केली. त्याची विनवणी ऐकून भगवान म्हणाले, "तुझे दु:ख निवारण करायला श्रीकृष्ण समर्थ आहेत." नंतर मलमासाला बरोबर घेऊन भगवान विष्णु श्रीकृष्णाकडे गोलोकी ( श्रीकृष्णाचे निवास स्थान ) गेले. श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन तो ( मलमास ) त्यांच्या चरणांवर कोसळला.त्याचे दु:ख भगवान श्री विष्णुंनी श्रीकृष्णाला सांगितले. परम कृपाळू दिनानाथ प्रभूंने त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला व श्रीकृष्ण म्हणाले, "तू मला शरण आल्यामुळे तुझे भाग्य मी उजळले आहे. आता यापुढे सर्व लोक तुला वंद्य मानतील. विश्वातील जे उत्तम गुण आहेत ते सर्व माझ्यात
असल्यामुळे" पुरूषोत्तम " हे नाव मला मिळाले आहे. ते नाव आजपासून मी तुला देत आहे.म्हणून तू यापुढे " पुरूषोत्तम मास " म्हणूनच ओळखला जाशील. स्वतः मी तुझा स्वीकार केला आहे. .तुझी जे पूजा करतील, ती पूजा मला मिळेल. माझ्या सारखे सगळे ऐश्वर्य त्यांना लाभेल.. श्री कृष्णांच्या कृपेने " मलमासास " हा " पुरूषोत्तम मास " म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला साक्षात श्रीकृष्णां कडून " पुरूषोत्तम मास " हे नाव मिळाल्यामुळे तो सर्व बारा महिन्यांहून अधिक श्रेष्ठ झाला . जगतात तो प्रख्यात बनला. भगवान श्री विष्णुंनी त्याला शत आशिर्वाद देऊन वैकुंठी अढळपद दिले. आणि सांगितले " जो कोणी हे " पुरूषोत्तम व्रत" प्रेमाने करेल त्याला सुखसमृद्धिचा लाभ होईल आणि अक्षय महापुण्य मिळेल.
अधिक मासाचा मंत्र
1) श्रीमन
नारायण नारायण हरी हरी
2) हरी ओम नमो
भगवते वासुदेवाय
असे हे अधिक मासाचे महत्व थोर आहे. पुरूषोत्तमाचे माहात्म्य अपार आहे.पुरूषोत्तमाचा महिमा व्यासमुनींनी वर्णिला आहे. त्याच्या रूपात भगवान श्रीकृष्णाने आपले स्वरूप मिळवले व त्या मालिन मासास देवत्व प्राप्त करून दिले
हे झाले अधिक महिन्याचे पौराणिक महत्व. पण " पुराणातील वांगी पुराणातच ' असा समज कृपया करून घेऊ नका. कारण प्रत्येक धर्माला शास्त्राचा आधार असतो. म्हणूनच पुढचा लेख नक्की वाचा त्यात बघुयात या मासाची शास्त्रीय जन्मकथा म्हणजेच शास्त्रीय उत्पत्ती.
धन्यवाद