Followers

Wednesday, 2 June 2021

फावल्या वेळात काय करायचं …..

फावल्या वेळात काय करायचं …..

महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैतवनात राहू लागतात. त्यांची विचारपूस करायला भगवान श्री कृष्ण वनात जातात.

त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे आता तु काय करणार भीमा. त्यावर भीम म्हणतो आता आमच्याकडे वेळच वेळ आहे मी खाणार आणि झोपणार, हे ऐकून भगवान कपाळावर हात मारतात आणि पुढे जातात.

भगवान झोपडीत जातात तिथे बसलेल्या द्रौपदीची विचारपूस करून तिला विचारतात ताई, नकुल सहदेव कुठे आहेत? द्रौपदी म्हणते ते पहा झाडाखाली बसलेत. भगवान त्यांच्याकडे जातात आणि त्यांना पाहतात तर हे दोघे सारीपाट खेळत असतात. भगवान त्यांना पाहून म्हणतात हौस फिटली नाही वाटत तुमची, या खेळामुळे तर ही वेळ आली आहे तुमच्या सर्वांवर ते दोघे लाजतात आणि भगवंताला प्रणाम करतात.

भगवान पुढे युधिष्ठिराकडे (धर्मराजा) जातात आणि म्हणतात काय हे धर्मा तुम्ही सर्व वेळ मिळाला म्हणून फक्त आराम करताय हे बरोबर नाही.

त्यावर अर्जुन म्हणतो, "हे कृष्णा, काय करणार आम्हाला आता वेळच वेळ आहे."

हे या सर्वांचे विचार ऐकून भगवान विचारात पडतात आणि निर्णय घेतात व सर्वांना एकत्र करून म्हणतात चला आपल्याला इंद्राकडे जायचं आहे.

तोच अर्जुन म्हणतो, "कशाला!"

भगवान म्हणतात तुला मृदंग शिकायचा आहे, धर्माला सल्ला कसा द्यायचा हे शिकायचं आहे, भीमाला स्वयंपाक, सहदेवाला घोडे राखायला, नकुलाला रथ चालवायला आणि द्रौपदीला झाडलोट करणं शिकायचं आहे. हे ऐकताच सर्व आचर्यचकित होऊन भगवंताकडे पाहू लागले.

धर्मराजा म्हणाले - भगवान आम्ही राजे आहोत, हे शिकुन काय फायदा? तुम्ही द्रौपदीचा तरी विचार करा ती भरतवर्षाची स्मरादिनी आहे.

भगवान म्हणतात जास्त विचार करू नका, वेळ आल्यावर कळेल सर्व. आणि हे सर्व इंद्र महालात जाऊन विविध काम शिकतात.

बारा वर्षांचा वनवास संपतो. पण एक वर्षाचा अज्ञातवास राहिला होता. (कौरवांनी बारा वर्षाचा वनवास पांडवाना दिला होताच पण त्याबरोबर असा डाव पण केला होता कि जर वनवासानंतर एक वर्षात जर तुम्ही आम्हाला दिसला तर परत तुम्हाला वनवास आणि अज्ञातवास होईल).

आता सर्वांना कळेना की आपण एक वर्ष लपायच कुठे? त्यांनी भगवंतांना विचारलं.

भगवान म्हणतात हिच ती वेळ आहे. तुम्ही रिकाम्या वेळात जी इंद्राकडे जाऊन काम शिकलात ना, आता तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि भगवंताने त्यांना विराट राजाचा पत्ता दिला.

ते सर्वजण स्वतःची ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची काम करतात. यात धर्मराजा कंक नावाचा ब्राह्मण होतो आणि राजाला सल्ला देतो, भीम बल्लव नावाचा आचारी होतो, अर्जुन बृहन्नडा नावाचा मृदंग वादक होतो, सहदेव घोडे राखणारा, नकुल रथ सारथी तर द्रौपदी विराट राजाच्या रानीची दासी होते.

या प्रमाणे खाली वेळात शिकलेल्या कामाचा त्यांना अशा प्रकारे फायदा होतो.

तात्पर्य ~ या कथेवरून हेच कळते की रिकामा वेळ मिळाला की झोपा काढण्यात आणि Games खेळण्यात वाया घालवायचा नसतो. तर या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं करावी.

व्यायाम, योग, घरगुती कामे, कोडी सोडवणे, विद्यार्थानी पुढच्या वर्षाचा अभ्यास, मुलामुलींनी दोघांनी वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे, गावात असाल तर शेतीची कामे अशी खुप काम आहेत आपल्याकडे.

सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या बुद्धीला मनाला चालना मिळण्यासाठी धार्मिक ग्रंथांचे अवलोकन, अध्ययन करणे आवश्यक आहे. कारण आपण MBA, CA, Advocate, M Com,ME असे उच्चशिक्षित असाल पण या शिक्षणामुळे माणूस विवेकी तर होतो.

पण तो विवेक वापरायला अध्यात्म शिकवते

धार्मिक ग्रंथ वाचून कोणाला पद मिळणार नाही. पण मिळालेल्या पदावर अहंकाररहित कसं राहायचं याची चालना मिळेल

कोणाला धन मिळणार नाही. पण जवळ १० रूपये जरी असतील तरी त्यात समाधानी कसं राहायचं याची चालना मिळेल

कोणाला प्रतिष्ठा मिळणार नाही पण दुसऱ्याच्या संपत्तीला पाहून मनात आग लागणार नाही

माणूस जन्माला आल्यापासून आनंदाच्या मागे धावतो आहे पण आनंद तर सोडाच, सुखही त्याला मिळत नाही कारण संसार दू:खालयम् अशाश्वतम्

आंनदस्वरूप फक्त भगवानच आहे तो आनंद(सत-चित-आनंद) श्रीमद्भगवद्गीतेत, श्री ज्ञानेश्वरीत, श्रीमद भागवतात, तुकोबा ज्ञानोबा गाथेत अशा अनेक ग्रंथात आहे.

आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी इतके ग्रंथ लिहुन ठेवलेत कि जर ते ग्रंथ एकमेकावर ठेवले तर वैकुंठापर्यंत शिडी तयार होईल.

भगवंताला ज्ञानी भक्त खूप आवडतो. हिच वेळ आहे मायबाप, इतके ज्ञानी व्हा कि जसे तुकोबा म्हणतात,

तुका सहज बोले जरी वाणी

वेदांत वाहे त्याच्याघरी पाणी।।

🌺🌼🏵️


Monday, 28 September 2020

अधिक मासाचे शास्त्रीय महत्त्व ( adhik masache shatriy mahatva )

                            

अधिक मासाचे शास्त्रीय महत्त्व

अधिक मासाचे शास्त्रीय महत्त्व


                                  
मागच्या लेखात म्हंटल्या प्रमाणे प्रत्येक धर्माला शास्त्राचा आधार असतो. आणि हेच शास्त्रीय महत्व जगासमोर आणण्या साठी हा लेखप्रपंच. जुन्या पिढीकडून धर्माचे फक्त पौराणिक महात्माच आजपर्यंत समोर आले. त्यामुळे आज कालच्या शिकलेल्या मुलांनां ह्या अंधश्रद्धा वाटू लागल्या. पण ह्या मुलांना हे कळत नाही कि सायन्स फक्त Re -search ( परत शोधणे ) करत. विज्ञान शोध लावू शकतो पण उपत्ती करू शकत नाही. कारण शेवटी विज्ञानाला मर्यादा येतात. असो. आता आपण बघुयात अधिकमासाची खगोलशात्रीय उत्पत्ती. 

 


अधिक मास हा पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. हा मास कसा येतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला " सूर्यसंक्रांत " आणि " चांद्रमास " या दोन्ही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. 




१) सूर्यसंक्रांत :- आपल्याला माहित आहे कि सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकतो. म्हणजेच तो तीस दिवसात ( एक महिन्यात ) ३० अंश पुढे सरकतो. जोतिष शास्त्रानुसार १ रास हि ३० अंशाची असते. याचाच अर्थ सूर्य १ महिन्यात १ रास पुढे सरकतो. यालाच " सूर्यसंक्रांत " असे म्हणतात. उदाहरण द्यायचे झाले तर हिंदू पंचांगानुसार जेंव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो यालाच आपण " मकरसंक्रांत " असे म्हणतात. सूर्यसंक्रांतीचा हा कालावधी किमान २९ दिवस १० तास ४८ मिनिटे ते कमाल ३१ दिवस १० तास ४८ मिनिटे एवढा असू शकतो. 


२) चांद्रमास :- " चांद्रमास " हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावास्येला संपतो. चांद्रमास हा किमान २९ दिवस ५ तास ४४ मिनिटे ते कमाल २९ दिवस १९ तास ३६ मिनिटे असतो.

चांद्रमास
चांद्रमास

 

आता आपल्या लक्षात आलेच असेल कि " चांद्रमास " हा " सूर्यमासापेक्षा " म्हणजेच " सूर्यसंक्रतीपेक्षा " लहान असतो. प्रत्येक सूर्यसंक्रतीमध्ये चांद्रमास हा येतोच पण प्रत्येक चांद्रमासात सूर्यसंक्रात होईलच असे नाही. कधीतरी अशी स्थिती येते की एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला ‘' असंक्रातीमास " म्हणजेच ‘' अधिक मास " म्हटले जाते. 



चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. जसे कि यावर्षीचे उदाहरण बघितले तर जो आता चालू आहे तो अधिक अश्विन आणि नवरात्री पासून जो सुरु होईल तो नाव अश्विन म्हणजेच आपला नेहमीच अश्विन महिना. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो. म्हणजेच आता परत साधारण १९ वर्षांनी परत अधिक अश्विन महिना येईल . 




चला आता पुढच्या लेखात बघुयात अधिक महीन्याचे वाण, त्याची माहिती, आणि हा अधिक महिना आपल्याला काय शिकवतो ते . तुम्हाला माझा ब्लॉग , त्यातील माहिती कशी वाटते ते मला comment करून नक्की सांगा. आणि तुमच्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना हा ब्लॉग शेअर करायला विसरू नका. 



Saturday, 19 September 2020

अधिकमासाची जन्मकथा ( Adhik Mahinyachi Janmakatha )

 अधिकमासाची जन्मकथा ( Adhik Mahinyachi Janmakatha )



Purushottam maas photo
पुरुषोत्तम मास


 

अधिक महिना म्हणजे काय?  तो कधी आहे ?  त्याचा पौराणिक आधार जाणून घेऊयात. 

 

          हिंदू कॅलेंडरप्रमाणे दर तीन वर्षानी एकदा अतिरिक्त महिना येतो, त्यालाच आपण "अधिकमास" किंवा “मलमास" किंवा "पुरुषोत्तम मास" तसेच धोंडी मास" असे म्हणतो. या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण विश्वभरातील हिंदू लोक या महिन्यात धार्मिक कार्य, पूजा, भगवत भक्ती, उपवास, जप आणि योग इत्यादीमध्ये व्यस्त असतात . असे मानले जाते की अधिकमासामध्ये केलेल्या धार्मिक कार्याचा परिणाम इतर कोणत्याही महिन्यात केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यापेक्षा 10 पट जास्त होतो. यामुळेच या महिन्यात सर्व लोक भक्तीने भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आनंदाने आणि मनापासून विधियुक्त पूजा आर्चा करतात.

 

अधिकमासाची जन्मकथा

 

एक दिवस नारदमुनींनी भगवान विष्णूंना विचारले, " हे प्रभू, दर वर्षी फक्त १२ महिनेच असतात.मग बरोबर पाऊणेतीन वर्षांनी हा अतिरिक्त महिना कसा काय येतो ? आणि त्याला एवढा मान का ? त्यावर भगवान नारायण म्हणाले , "मुनिवर्य ! चांगले किंवा वाईट हे आपल्या पाप आणि पुण्याच्या प्रमाणांवर अवलंबून असते. पण सर्वत्र फक्त दुष्कृत्येच वाढली आहेत त्यामुळे साहजिकच हि वाढलेली पापे आपल्याला सहन होत नाही अशी बाराही महिन्यांनी मिळून तक्रार केली. त्या पापांचे जड ओझे बारा 

महिन्यांच्या पोटात मावेनाशे झाले. त्यामुळे त्या बाराही महिन्यांनी आपापल्या पोटातील पापाचा फक्त तिसरा हिस्सा बाहेर काढून टाकला. बाराही महिन्यांनी आपापल्या  पापांचे ओझे तेवढा कमी केले . परंतु बाराही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापाच्या हिस्स्यापासून तेरावा महिना जन्माला आला. तोच हा " अधिक मास ". पण तो पापमय असल्याने त्याला " मलमास " किंवा मलिनमास असे नाव पडले. सगळे आपला तिरस्कार करतात, आपण कोणालाच आवडत नाही आपलं नावसुद्धा कोणी घेत नाही हे बघून तो अतिशय दुःखी  झाला. त्याला फार वाईट वाटले.  कारण सगळ्या बारा महिन्यांना  प्रत्येकी इष्ट देव होता पण आपला कोणीच स्वामी नाही. माझ्या मासात सूर्यहि साधी त्याची प्रदक्षिणा करायला तयार नाही. त्यामुळे शुभ कार्येही होत नाही. . आपली अशी दुर्दशा झालेली पाहून तो आपल्या दैवाला दोष देऊ लागला व मुक्ति मिळावी या इच्छेने तो ( मलमास ) शेवटी वैकुंठात श्री भगवान विष्णुंकडे गेला.त्यांची प्रार्थना केली. त्याची विनवणी ऐकून भगवान म्हणाले, "तुझे दु:ख निवारण करायला श्रीकृष्ण समर्थ आहेत." नंतर मलमासाला बरोबर घेऊन भगवान विष्णु श्रीकृष्णाकडे गोलोकी ( श्रीकृष्णाचे निवास स्थान ) गेले. श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन तो ( मलमास ) त्यांच्या चरणांवर कोसळला.त्याचे दु:ख भगवान श्री विष्णुंनी श्रीकृष्णाला सांगितले. परम कृपाळू दिनानाथ प्रभूंने त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला व  श्रीकृष्ण म्हणाले, "तू मला शरण आल्यामुळे तुझे भाग्य मी उजळले आहे. आता यापुढे सर्व लोक तुला वंद्य मानतील. विश्वातील जे उत्तम गुण आहेत ते सर्व माझ्यात 

असल्यामुळे" पुरूषोत्तम " हे नाव मला मिळाले आहे. ते नाव आजपासून मी तुला देत आहे.म्हणून तू यापुढे " पुरूषोत्तम मास " म्हणूनच ओळखला जाशील. स्वतः मी तुझा स्वीकार केला आहे. .तुझी जे पूजा करतील, ती पूजा मला मिळेल. माझ्या सारखे सगळे ऐश्वर्य त्यांना लाभेल.. श्री  कृष्णांच्या कृपेने " मलमासास " हा " पुरूषोत्तम मास " म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला साक्षात श्रीकृष्णां कडून " पुरूषोत्तम मास "  हे नाव  मिळाल्यामुळे तो सर्व बारा महिन्यांहून अधिक श्रेष्ठ झाला . जगतात तो प्रख्यात बनला. भगवान श्री विष्णुंनी त्याला शत आशिर्वाद देऊन वैकुंठी अढळपद दिले.  आणि सांगितले " जो कोणी हे " पुरूषोत्तम व्रत"  प्रेमाने करेल त्याला सुखसमृद्धिचा लाभ होईल आणि अक्षय महापुण्य मिळेल. 


अधिक मासाचा मंत्र 


1) श्रीमन नारायण नारायण हरी हरी

2)  हरी ओम नमो भगवते वासुदेवाय 

 

असे हे अधिक मासाचे महत्व थोर आहे. पुरूषोत्तमाचे माहात्म्य अपार आहे.पुरूषोत्तमाचा महिमा व्यासमुनींनी वर्णिला आहे. त्याच्या रूपात भगवान श्रीकृष्णाने आपले स्वरूप मिळवले व त्या मालिन मासास देवत्व प्राप्त करून दिले

हे झाले अधिक महिन्याचे पौराणिक महत्व. पण " पुराणातील वांगी पुराणातच ' असा समज कृपया करून घेऊ नका. कारण प्रत्येक धर्माला शास्त्राचा आधार असतो. म्हणूनच पुढचा लेख नक्की वाचा त्यात बघुयात या मासाची शास्त्रीय जन्मकथा म्हणजेच शास्त्रीय उत्पत्ती.  


धन्यवाद 

 


फावल्या वेळात काय करायचं …..

फावल्या वेळात काय करायचं ….. महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैतवनात रा...